सरकारी शाळेच खाजगीकरण शासनाने त्वरीत रद्द करावे…

0 minutes, 0 seconds Read

लेखक.बालकवी गणेश घुले
अभिनंदन!

दारू बनविणाऱ्या कंपनीला शाळा दत्तक देऊन शाळेत लावणीचा कार्यक्रम केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे तमाम जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन! जिथे मुलं काळ्या फळ्यावर उज्वल भविष्याची अक्षरे गिरवतात तिथे तुम्ही आज बाया नाचवत आहात. “वेगवान” निर्णयाच्या “गतिमान” महाराष्ट्राची ही प्रगती पाहायला डोळे आसुसले होते. तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ड्रग्स, गांजा,चरस विक्रेत्यांना पण काही शाळा दत्तक देऊन टाका आणि रात्री शाळेत रेव्ह पार्टी, पब डान्सचे लवकरात लवकर आयोजन करा.तुमची मुलं कॉन्व्हेन्ट मध्ये शिकत आहेत.

गोरगरिबांच्या मुलांना काय करायचे शिक्षण! तुमच्या घराच्या नाल्या, ड्रेनेज साफ करायला लागतील ना ही गोरगरिबांची मुलं! ग्रामीण भागातल्या फक्त बावीस हजार शाळा बंद करून कसं चालेल ? कामाला लागा. ग्रामीण भागातली एकही शाळा सुरू राहता कामा नये! शेवटी गरिबांच्या पोरांना शेतीच तर करायची आहे. शेती करायला कशाला हवय शिक्षण ? शेतकऱ्यांच्या पोरांच्या शाळा बंद झाल्याचं पाहिजेत. नाहीतर पुढच्या पिढीतून गळफास कोण घेईल ? दरवर्षी दहा हजार पेक्षा जास्त आत्महत्या होतात आपल्या महान राज्यात! ही महान परंपरा खंडित होता कामा नये. नाहीतर तुम्हाला राजकारण कसे करता येईल ? नाहीतर मड्यावरचे लोणी कसे चाटता येईल?

मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीला बरोबर दीडशे वर्ष झाली आहेत. यापेक्षा काय चांगला मुहूर्त असू शकतो बावीस हजार शाळा बंद करायला. बरोबर आहे तुमचं! तुमची लेकरं शिकत आहेत ना कॉन्व्हेन्ट मध्ये. मग गणपती मध्ये ढोल वाजवायला, नवरात्रात दांडिया खेळायला, बिना चपलेच्या पायी वाऱ्या करायला मुले लागतील ना!

शाळा बंद केल्यामुळे अशा मुलांची फौजच्या फौज तुम्ही निर्माण करणार आहात!सलाम आहे तुमच्या या भव्य दिव्य नवनिर्माणाला! एकदा का गोरगरीबांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद झाले की पक्षाचा झेंडा धरायला आणि दंगलीत दगडं मारायला किती “कार्यकर्ते” हात मोकळे होणार आहेत!आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची लेकरं कॉन्व्हेन्ट मध्ये शिकून परदेशात स्थायिक होतील आणि मग आपल्या देशातला बहुसंख्य हिंदू खतरे मे है! त्याची रक्षा करायला नको ! त्यासाठी हिंदू धर्म रक्षक लागतील ना ! या महान कार्यात बावीस हजार शाळेची आहुती दिल्याशिवाय हे शक्य आहे का ? मायबाप सरकार हो! पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन !माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेव्हढे बहुजनांची लेकरे शिकवीन असे म्हणणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या महाराष्ट्रात तुम्ही घेतलेला हा निर्णय आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असाच आहे.
जय हो सरकार की !

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *