“मृगजळी..!”

0 minutes, 0 seconds Read

ती सूंदर तशीच सालस होती. घरातल्या सगळ्यांची लाडकी. तिच्या जन्मापासून तिच्या बापाने तिच्यासाठी स्वप्नाचे हजार इमले बांधलेले. त्या इमल्यात त्याच्या घामाचा दर्प आणि मायेचा ओलावा घट्ट विणलेला होता. तिला हवं नको ते सगळं पुरवणं हेच त्याचं आयुष्य होतं. त्याच्या ह्याच हळवेपणानं ती मात्र स्वतःतच गुरफटून गेली. हळू हळू ती फुलायला लागली.. बोलायला लागली.. मनासारखं बागडायला लागली… आता तिला बापाच्या उबदार खोप्यापेक्षा तिला तिच्या पंखाच आकर्षण जास्त वाटू लागलं. त्याच पंखांना घेऊन ती स्वैर उडायला लागली. तिचं असं स्वैर उडणं बापाला चिंतेच वाटलं. बाळा जास्त उडू नकोस पडशील म्हणून तो तिला थांबवायचा. तिचा बाप आता तिला खोप्याकडे बोलवायचा. एवढं उडणं बर नाही असं तिला सांगायचा. पण तिला वाटायचं आपला बाप कधी आकाशी उडालाच नाही. खोपा सोडून बाहेर कधी पडलाच नाही. मग या उडण्याचा रोमांच त्याला कसा कळणार…? तिचंही बरोबरच होत म्हणा.. त्याला उंच उडणं कळेलं तरी कस; तो तर तिच्या जन्मापासून स्वतःच्या पंखालाच विसरला होता ना..! तिच्या भविष्याचे इमले बांधताना तो मात्र स्वतः उडाचंच विसरला होता…!ती चिवचिवणारी पिलूडी आता पोक्त झाली होती. तारुण्याच्या वळणावर ती भांबावलेली होती. योग्य अयोग्याच्या कुंपणात ती कैद होणारी नव्हती. तिचं फुलासारख फुलनं काळ्या भृंगराने हेरलं. तिच्याभोवती प्रेमाचं गुंजन त्यानं गुंफल. प्यार- व्यार.. इष्क-विश्क… ह्या शब्दांनी तिलाही वेधलं होतं. अशाच त्या शिकाऱ्यान तिला जाळ्यात ओढलं होतं. ती त्याच्या धुंदीत विसरली खोपा.. पापा.. आणि पापाच्या स्वप्नांच्या इमल्याला..! वय होत बेफिकिरीच, भान हरवलेलं. फिल्मी जगात स्वप्न रंगवलेल. ह्या स्वप्न रंजनांतून बाहेर पडण्याची तिची इच्छाच नव्हती. मन मानेल ते तशी स्वैर जगण्याची धुंदी तिला चढली होती.ज्याचं घर, दार, कुटूंब, संस्कार काहीच माहीत नव्हतं तिला त्यालाच तिनं आपलं मानलं होतं. तिला आता फक्त तोच दिसत होता. जगेल तर त्याच्याच सोबत.. मरेन तेही त्याच्याच सोबत..! तिच्या अशा वागण्यानं तिच्या बापाला धक्काच बसला. आपण वाढवलेलं झाडं आपल्यावरच कोसळणार काय ? अशी भीती त्याला वाटू लागली. तो तिला समजावू लागला. तिच्या विनवण्या करू लागला.. आपल्या त्याच नासमज लाडकीच्या भविष्याला वाचवण्यासाठी लाचार होऊन तिच्याच विनवण्या करू लागला. पण ती मात्र त्या लाचार झालेल्या बापापुढं बंडखोर झाली होती. सोळा वर्ष बापानं केलेलं जीवापाड प्रेम विसरून तिला काही महिन्यापूर्वीच तरुण्यातल ते आकर्षण मोठं वाटू लागलं. बापाचंही ऐकायला ती कशीच नव्हती तयार…. बापाचं अति प्रेम आता बापालाच नडल होतं. तिनं मात्र त्याच प्रेमाचं असं ऋण फेडल होतं. तिचा प्रेम ज्वर तिच्या बापालाच पोळला. तिचा बाप त्या धक्क्याने मनातून बिथरला…”असं परधर्मातल्या पोरासंग संसार होत नाही पोरी.. तुझ्या अल्लड इच्छेसाठी तुझं भविष्य नासवू नको पोरी..” असं म्हणून तिची आई तिच्या विनवण्या करत होती.तिच्या लेकीच्या उन्मादपनावर आईही आसवं ढाळत होती. पण मृगजळाच्या पाठशिवणीच्या खेळात रमलेली ती पक्षीन कुणाचं ऐकणार थोडीच होती. “प्रेमाला जात नसते आई… ना असतो धर्म… प्रेम प्रेमच असतं” असे फिल्मी संवाद म्हणून आईला ती तोंडघशी पाडत होती. त्यांच्या विरोधाला झुगारून तिनं एकदाचाच निर्णय घेऊन टाकला. न सांगता बापाच्या घराचा उमरा तिनं तोडला. आपल्या त्या प्रियकरासोबत पळून जाताना बापाचा हात कायमचा सोडला. तिच्या जाण्यानं तिचा बाप वेडापिसा झाला. तिच्या आत्मकेंद्री वागण्याने तो एकाकी पडला. पोरींन समाजात माझं नाक मारलं म्हणून एकाकी रडू पडू लागला. समाजाच्या भीतीने त्याला मनातून पोखरलं होत. त्याला पाहून त्याच्या पत्नीलाही जगणं असह्य झालं होतं. लेक लाडकी न सांगून दूरदेशी गेली. माय आपल्या लेकीसाठी क्षणाक्षणाला मेली.एका चुकीन ती घराला परकी झाली, दिवास्वप्न घेऊन ती उंच भुर उडाली. अन सहा महिन्यात गेली तशी एक दिवस जड पावलांन परत घरी आली. जाताना जो सोबत होता तो प्रियकर आता सोबत नव्हता. त्याचा एक अंश मात्र तिच्या पोटात जिवंत आकार घेत होता. त्याच्या अशा धोकाधाडीनं तिच्या मनावर आघात झाला. ती आक्रोश करत होती. मदतीसाठी हात पसरत होती. पण यावेळी सगळ्यांनीच तिच्याकडे कानाडोळा केला. ज्या समाजाला तिनं झिडकारल होतं तोच समाज आता तिच्यावर थुंकू लागला. तिला विनवण्या करणारा बापही आता कठोर झाला होता. ती भानावर येण्याऐवजी आता भान हरवून बसली होती. तिच्या आत्मप्रौढीची इंगळी आता तिलाच डसली होती. तिच्या स्वप्नातला तो राजकुमार स्वतःची हौस भागवून फरार झाला होता. त्यानं दिलेली भेट तिच्या उदरात वाढत होती. त्याची आठवण म्हणून एक लेक तिच्याही पोटी येत होती. त्याच्यापासून तिला एक मुलगी झाली. तिनं त्याची ती आठवण रेल्वेच्या बोगीतून कोणा देशी सोडून दिली. बाप गेला, बापाचा खोपा गेला.! माय गेली मायेची सावली गेली..! ज्याच्यासाठी एवढा त्याग केला, तोही हौस भागवून फरार झाला.. कुमार वयात जन्म दिलेल्या लेकीला बेवारस सोडून दिलं.. एकाच चुकीच्या उन्मादानं तिचं सर्वस्व नेलं. वाट चूकलेल्या त्याच रेल्वेस्टेशनवर वेडी होऊन ती आजही त्याची वाट पाहतेय. त्याचं वेडेपणात नराधम लोक तिच्या शरीरावर भोगाचे आसूड आजही ओढतायेत. तिच्या देहाची ही विटंबना अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याच विटंबनेतून तिला एक मुलगा झालाय. तो मुलगा आता दीड दोन वर्षांचा.. त्या प्लॅटफॉर्मवर तो हमखास खेळताना दिसतोय. तो प्लॅटफॉर्मच त्याला आपलं घर वाटू लागलंय. रुळावरची रेल्वे त्याला त्याची खेळणी वाटतेय. स्टेशनवर फिरणाऱ्या माणसाना तो डोळे भरून न्याहाळतो. कदाचित आपल्या न पाहिलेल्या बापाचा शोध त्याचे चिमुकले डोळे घेत असतील. त्या तान्हुल्याला कडेवर बसवून ती हात पसरत असते. स्टेशनचा एक कोपरा धरून झोपताना ती भान विसरत असते. तिच्या दिसण्याचा आणि असण्याचा पिपासू श्वापदं शोध घेतात. तिच्या मुकेपणाचा भयाण रातीला वेध घेतात….!देव देव करणारी.. माणुसकी बडवणारी.. निषेध करणारी.. खैरात वाटणारी.. पूजापाठ करणारी.. अनेक सज्जन माणस येतात नि जातात.. त्या निरागस पोरकडं बघून हळहळ व्यक्त करतात. त्या चिमुकल्या लेकराला हळहळणारे अनेक डोळे रोज दिसतात तिथे… पण मायेनं जगण्याचा आधार देणारे हात सरावताना पाहण्याची आस लागलीय त्या निरागस चिमण्या डोळ्यांना..!तेच हात होण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे…!

लेखक

दादासाहेब श्रीकिसन थेटे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *